पंतप्रधान मोदींकडून भारतीय क्रिकेट संघ आणि ज्युनियर हॉकी संघाचे कौतुक

गेल्या काही दिवसांमध्ये भारताचे खेळातील प्रदर्शन चांगले राहिले आहे. त्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून भारतीय क्रिकेट संघ आणि ज्युनियर हॉकी संघाचे कौतुक केले आहे.  त्यांच्या खेळाने सर्व देश प्रभावित झाला असून आम्हाल तुमचा गौरव आहे असे गौरवोद्वार त्यांनी यावेळी काढले.

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडला ४-० ने हरवले. तर ज्युनियर हॉकी संघ हा जगज्जेता ठरला त्यांच्या या कामगिरीमुळे देशाची मान उंचावली आहे असे पंतप्रधानांनी म्हटले. भारतीय असल्यामुळे माझ्या आनंदाला सीमा उरली नाही या शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना प्रकट केल्या. काही खेळाडूंचा खेळ हा खरोखर चमकदार झाला असे ते म्हणाले. करुण नायर, के. एल. राहुल यांचा खेळ शानदार झाला, भारतीय क्रिकेट संघातील हे युवा खेळाडू कौतुकास पात्र आहे असे पंतप्रधान म्हणाले.

विराट कोहलीच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करीत ते म्हणाले विराट कोहलीची वैयक्तिक कामगिरी तर सरस आहेच परंतु उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने प्रेरणादायी नेतृत्व काय असते याचे उत्तम उदाहरण दिले आहे. फिरकीपटू आर. अश्विन यास आयसीसीचा क्रिकेटर ऑफ द इअर हा पुरसस्कार मिळाला आहे. त्याचे पंतप्रधनांनी अभिनंदन केले.

त्यानंतर पंतप्रधानांनी भारताच्या ज्युनियर हॉकी संघाचे कौतुक केले. पंधरा वर्षाच्या अंतराने आलेली ही बातमी ऐकून मी खूप आनंदी झालो असे ते म्हणाले. या सणासुदीच्या काळात हॉकी संघाने विजयी होऊन भारतीयांच्या आनंदात भर घातल्याचे ते म्हणाले.
भारतीयांने संपादलेले हे यश शुभसंकेत असल्याचे ते म्हणाले. मागील महिन्यात भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई स्पर्धा जिंकली होती. त्यांचे देखील पंतप्रधानांनी कौतुक केले.