मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी ‘एम्स’ रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची तब्येत खालावली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त एएनआयने दिलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप येत असल्याची माहिती आहे. यातून प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे अखेर त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

२००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग यांना या वर्षी कोरोनाची लागण झाली आहे. ते १९ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर २९ एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मनमोहन सिंग यांनी ४ मार्च आणि २ एप्रिल रोजी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे ८८ वर्षांचे आहेत आणि ते साखरेच्या आजारानेही त्रस्त आहेत. त्यांच्या दोन बायपास शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया १९९० मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली. तर २००९ मध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया एम्समध्ये करण्यात आली. गेल्या वर्षी मे महिन्यातही त्यांना ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या