मोदींना समज द्या; मनमोहन सिंग यांचे थेट राष्ट्रपतींना पत्र

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटक निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे मात्र कॉंग्रेस आणि भाजपमध्ये सुरु असलेला एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रकार सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान काँग्रेस नेत्यांबद्दल धमकी दिल्याचा आरोप करत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून मोदींच्या भाषेबद्दल आक्षेप नोंदवला आहे. मोदींना जबाबदारीने बोलण्यास सांगा अशी मागणी सिंग यांनी या पत्रात केली आहे.

हुंबळी येथे झालेल्या मोदींच्या सभेचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांनी कान खोलून ऐकावे, जर तुम्ही तुमची मर्यांदा ओलांडणार असाल तर हा मोदी आहे, तुम्हाला किंमत चुकवावी लागेल असे मोदी या सभेत म्हणाले होते.

पंतप्रधानांनी काँग्रेस नेतृत्वाबद्दल जी धमकीची भाषा वापरली त्याचा निषेध केला पाहिजे. लोकशाही देशातील पंतप्रधानाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमात अशा प्रकारचे भाषण योग्य नाही असे या पत्रात म्हटले आहे. मोदींची भाषा धमकीवजा असल्याचं मनमोहन सिंह यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.