मनमाड-इंदूर’ रेल्वेमार्गाला अखेर मुहूर्त

धनंजय दीक्षित / धुळे : मनमाड-इंदूर या बहुप्रतिक्ष‌ति रेल्वेमार्गाला अखेर मुहूर्त लागला असून, येत्या शनिवारी (दि. २९) रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचा धुळे दौरा निश्चित झाला आहे. यामध्ये धुळ्यात रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक होणार असून, याचवेळी मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजनही केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

प्रस्तावित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळविली आहे. या मार्गाची पुढील प्रक्रिया वेगाने व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. भामरे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना धुळे भेटीसाठी आग्रह करीत होते. गेल्या तीस वर्षांत जिल्ह्यात देशातील सुरेश प्रभू हे पहिलेच रेल्वेमंत्री आहेत जे धुळेकरांना गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित असलेले मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या स्वप्नपूर्तीची भेट देण्यासाठी धुळ्यात येत आहेत. त्यासाठीच डॉ. सुभाष भामरे यांनी सुरेश प्रभू यांना प्रत्यक्ष धुळे येथे येऊन समस्त धुळेवासियांना ही अमूल्य भेट द्यावी म्हणून आग्रह धरला. या आग्रहामुळे रेल्वेमंत्री प्रभू धुळ्यात येणार आहेत.

धुळे बैठकीदरम्यान संबंधित रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या विषयांसंदर्भात प्रगतीचा आढावा घेणार आहेत. तसेच मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाच्या कामास लवकरच सुरुवात होण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना सूचनादेखील करणार आहेत.