‘लढाई अकार्यक्षमतेविरूद्ध कार्यक्षमतेची’; सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी भाजपचा वचननामा जाहीर

सांगली : सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी येत्या १ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून महापालिका निवडणुकीसाठीचा भाजपचा वचननामा आज जाहीर करण्यात आला. “ मनात भाजपा..मनपात भाजपा ” असा नारा देत भाजपने महापालिका क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठीचा आराखडा या वचननाम्याद्वारे सादर केला आहे.

स्वबळाच्या तयारीला लागा ; अमित शहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते तसेच सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, खा. संजयकाका पाटील, आ. सुरेशभाऊ खाडे, आ. सुधीरदादा गाडगीळ आणि आ. शिवाजीराव नाईक , जिल्हा परिषद अध्यक्ष मा. संग्रामसिंह देशमुख, सांगली जिल्हाअध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, प्रकाशतात्या बिरजे,  नीताताई केळकर, दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

सांगली महापालिका निवडणुकीला स्वबळावर पहिल्यांदाच सामोरे जाणाऱ्या भाजपने शहर आणि उपनगरांच्या सर्वांगिण विकासाची हमी देणाऱ्या वचननाम्याचे आज प्रकाशन केले. वचननाम्याच्या मुखपृष्ठावर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांची छबी असून “ लढाई अकार्यक्षमतेविरूद्ध कार्यक्षमतेची ” अशा ओळी या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर मुद्रीत करण्यात आल्या आहेत.

या वचननाम्याच्या प्रस्तावनेत राज्याचे महसुल, सार्वजनिक बांधकाम आणि मदत व पुनर्वसन मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री असलेले सहकार मंत्री मा. सुभाष देशमुख यांनी सांगलीवासियांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत शहराच्या विकासाबाबतची भाजपची भुमिका स्पष्ट केली आहे. गेल्या चार वर्षांत भाजपने राज्यात, विशेषत: सांगली परिसरात केलेल्या विकासकामांची जंत्री या जाहिरनाम्याच्या सुरूवातीलाच देण्यात आली असून पुढच्या भागात शहराच्या विकासाचे व्हिजन मांडण्यात आले आहे.

अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने नवभारताचा उदय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

वचननाम्यातील प्रमुख मुद्दे

 • विकास आराखड्यानुसार शहराचा नियोजनबद्ध विकास करणार
 • रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहे, महिलांसाठी स्वच्छतागृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अल्पदरातील वैद्यकीय सेवा, पथदिवे, क्रिडांगणे, उद्याने, मंडई, विश्रामबाग परिसरात देखणे नाट्यगृह,
 • नाना-नानी पार्क यासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी आणि अद्ययावतीकरण
 • मनपा प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय आणि संवादासाठी तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेल्या विविध समित्यांचे गठन
 • शहराच्या प्रत्येक भागाचा समतोल विकास व्हावा, निधीचे योग्य वाटप व्हावे यासाठी नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली नियोजन समिती स्थापणार
 • महापालिका आणि व्यापारी संघटना यांची समन्वय समिती स्थापन करून औद्योगिक क्षेत्रातील पायभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करणार
 • परिसरातील औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करणार
 • महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी विशेष प्रयत्न, महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहे, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स बसवणार
 • महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगासाठी उद्योजक गटांची निर्मिती, प्रशिक्षण, अर्थसहाय्य यासाठी नगरसेविका आणि होतकरू महिलांचा समावेश असलेली विशेष सुकाणु समिती
  शहरात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणार
 • घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष बाब म्हणून शासनाकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देणार, कचऱ्यावर तांत्रिक प्रक्रियाकरून महापालिकेसाठी दरवर्षी दहा कोटींच्या उत्पन्नाची तरतूद करणार
 • मनपा शाळांचे सक्षमीकरण आणि डिजिटलायजेशन करून ई लर्निंगवर भर देणार, शिक्षण विभागासाठी विशेष निधी देणार
 • सीसीटीव्ही, रोड सेफ्टी बॅरिअर, व्हीएमएस बोर्ड व वायफाय सुविधांच्या माध्यमातून नागरीकांच्या सुरक्षेची काळजी घेणार
 • भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी विशेष उपाययोजना राबवणार
 • गुंठेवारी क्षेत्राचे नियमितीकरणासोबतच आवश्यक त्या उपाययोजना राबविणार
 • चोवीस तास शुद्ध व नियमित पाणीपुरवठा
 • शेरीनाला प्रकल्प मार्गी लावून कृष्णा नदी व नदी पात्र स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी कटीबद्ध
 • झोपडपट्टी पुनर्वसन, मनपाच्या आरक्षित भुखंडांचा विकास
 • मोफत वा माफक दरातील आरोग्यसेवा

गेल्या चार वर्षांत भाजपची कामगिरी

 • महापालिका क्षेत्रात मा. चंद्रकांत पाटील यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १०० कोटींपेक्षा अधिकचा निधी रस्ते बांधणीसाठी खर्च
 • आ. सुरेशभाऊ खाडे, आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका क्षेत्रात रस्तेबांधणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून ५५ कोटींचा निधी
 • माई घाटाचे बांधकाम पूर्ण करून प्रकाशव्यवस्था आणि नौकायनाची सुविधा
 • पेठनाका ते सांगली -मिरज या तब्बल १४०० कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी
 • आ. सुरेशभाऊ खाडेंच्या पाठपुराव्यामुळे मिरज ते सुभाषनगर महापालिका हद्दीपर्यंतच्या रस्त्यासाठी ५ कोटी ५५ लाख, तसेच शास्त्री चौक (मिरज) ते तानंगफाटा रस्त्यासाठी १०० कोटींच्या कामांना मंजूरी
 • हरीपूर -कोथळी पुलासाठी आ. गाडगीळ यांच्या प्रयत्नामुळे मंजुरी
 • आ. गाडगीळ यांच्या प्रयत्नांमुळे एलबीटीतून व्यापाऱ्यांना दिलासा
 • दलित वस्ती सुधारणेसाठी महापालिका क्षेत्रात १० कोटी, तर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १२ कोटींचा घरकुल प्रकल्प पुर्णत्वाच्या मार्गावर
 • सांगली – मिरज रस्त्याचे सहापदरीकरण, विश्रामबाग दत्तनगर येथे ८० फुटी रस्त्याचे काम पूर्ण
 • सांगली -मिरजेमधील इदगाह मैदान सुशोभिकरणासाठी आ.खाडे आणि आ. गाडगीळ यांच्याद्वारे निधी
 • मुस्लीम बिरादरी संस्थेच्या (सांगली) सभागृहासाठी आ. गाडगीळ यांच्याद्वारे २० लाख मंजूर, प्रकल्प पुर्णत्वाच्या मार्गावर
 • आ. गाडगीळ यांच्या प्रयत्नातून मुस्लीम एज्युकेशन सोसायटीला उर्दू महाविद्यालयाची मंजुरी
 • आ. गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे सांगली शहराच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी ३६ कोटींची मंजुरी
 • आ. खाडेंच्या पाठपुराव्यामुळे मिरज शहरासाठी स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी १०३ कोटींची अमृत योजना मंजूर
 • कुपवाड शहरासाठी सांडपाणी प्रकल्प योजना मुख्यमंत्र्यांच्या विचाराधीन
 • वसंतदादा सिव्हिल हॉस्पिटल दुरूस्तीसाठी, अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन आणि ओपीडीच्या नव्या
 • इमारतीसाठी ३० कोटी मंजुर, काम पुर्णत्वाकडे
 • खा. संजयकाका पाटील आणि आ. गाडगीळ यांच्या प्रयत्नातून कुपवाड आणि औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या वारणाली रेल्वेफाटकावर उड्डाणपुलासाठी २५ कोटी खर्च, प्रकल्प पुर्णत्वाच्या मार्गावर