मानाचा पहिला गणपती कसबा

kasba ganpati bappa

महाराष्ट्रातील लाखो गणेश भक्त ज्या दिवसाची वाट पाहत आहेत तो गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष म्हणजे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव आपली १२५ वर्षे पार करत आहे. स्वातंत्रपूर्व काळात देव्हाऱ्यातील गणपती रस्त्यावर आणून लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. सर्वप्रथम १८९३ मध्ये टिळकांनी सावर्जनिक गणेश मंडळांची स्थापना केली आणि तेव्हापासून आजपर्यँत या उत्सवाचा वारसा जपला आणि जोपासला जातोय. आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक रित्या मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. अस असल तरीही पुण्यातील गणेशोत्सवाने आपल वेगळेपण जोपासलं आहे. पुण्यात आज शेकडो मंडळे आपली शंभरी पूर्ण करत आहेत.  

 पुण्यातील मानाच्या  पाचही गणपतींचे आपले वेग-वेगळे महत्व आणि त्यामागचा  इतिहास देखील तेवढाच रंजक आहे. याच पाच मानाच्या गणपतींचा इतिहास आणि त्यांचे महत्व आपण महाराष्ट्र देशाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

मानाचा पहिला कसबा गणपती

 मानाचा पहिल्या कसबा गणपतीच एक वेगळा वैशिष्ट आहे या बाप्पांची मिरवणूक पालखीतुन काढली जाते. आधी मिरवणुकीसाठी लाकडाची पालखी वापरली जात होती आता काळानुरूप चांदीची  सुंदर अशी पालखी बनवण्यात आली आहे. कसबा गणपतीची मूर्ती जर आपण निरखून पाहिली तर बाप्पांच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले दिसता.  

पुण्याचे ग्रामदैवत असलेला कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती आहे. राजमाता जिजाबाई यांच्या निवासस्थानाच्या परिसरात राहणाऱ्या विनायक ठकार यांच्या घराजवळ गणपतीची मूर्ती सापडली. जिजाबाईंनी कसबा गणपतीचे मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. कसबा गणपती मंदिराला दोन गाभारे आहेत. या मंदिराला पर्यटक आणि भाविक वर्षभर भेट देत असतात. गणेशोत्सवा दरम्यान भाविकांमध्ये हे मंदिर आकर्षणाचे प्रमुख केंद्र असते.

 पुण्यामध्ये पहिल्यांदा जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला त्यानंतर पुढच्याच वर्षी मिरवणुकी दरम्यान कोणाचा गणपती पुढे असावा हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्वत: लोकमान्य टिळक यांनी कसबा गणपती हे शहराचे ग्रामदैवत आहेम्हणून त्याला अग्रक्रम देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून कसबा गणपती मिरवणुकीच्या अग्रभागी राहून नेतृत्व करत आहे.