पुरुषाच्या पोटात गर्भाशय; पुण्यातील नामांकित रुग्णालयाचा अजब रिपोर्ट

पुणे: तुम्ही जर पुरुष असाल आणि पोटदुखीमुळे त्रस्त असल्यास इलाज करण्यासाठी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी तुमच्या पोटात गर्भाशय आहे म्हणून सांगितले तर काय होईल. नक्कीच तुम्हाला धक्काच बसणार ना. असाच काहीसा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. पोटदुखीवर इलाज करण्यासाठी प्रशिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला असून एका पुरुषाच्या पोटात चक्क गर्भाशय असल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला आहे.

पोटदुखीनं त्रस्त असलेले पुण्यातील सागर गायकवाड हे 7 मे रोजी फॅमिली डॉक्टरकडे गेले, त्यानंतर डॉक्टरांनी गायकवाड यांना सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सागर गायकवाड यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सोनोग्राफी केली. पण हा अहवाल पाहून गायकवाड यांना धक्काच बसला. कारण की, या अहवालात गायकवाड यांच्या पोटात चक्क गर्भाशय असल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलं होतं.

या प्रकारानं चकित झालेल्या गायकवाड यांनी तात्काळ दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि दुसऱ्यांदा तपासणी केली. यावेळी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल चुकीचा असल्याचं निष्पन्न झालं. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे सागर गायकवाड यांना तब्बल दोन महिने तणावाखाली घालवावे लागले.