‘पप्पा, लवकर घरी परत या…!’ लेकीच्या आर्त हाकेनंतर सीटी स्कोअर १८ असूनही केली कोरोनावर मात !

आरमोरी : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. तर, बड्या नेत्यांसह अनेक कलाकारांचा देखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या थैमानामुळे चिंताजनक वातावरणातही काही दिलासादायक व सकारात्मक असे वृत्त समोर येत आहेत.

कुठे नव्वदीपर केलेले वृद्ध व्यक्ती कोरोनावर मात करून घरी सुखरूप परतत आहेत, तर कुठे प्रकृती चिंताजनक असूनही प्रबळ इच्छेने कोरोना हरवत आहेत. अशीच एक सकारात्मक घटना आता समोर येत आहे. कोरोनाची लागण झाल्याने वडिलांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या लाडक्या लेकीने त्यांना आर्त साद हाक दिली आणि तब्बल १७ दिवस मृत्यूशी झुंज देऊन ते घरी सुखरूप परतले आहेत.

आरमोरी तालुक्यातील ठाणेगावच्या देवानंद बोरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना सुरुवातीला साधा सर्दी व ताप आला होता. त्यांनी गोळ्या घेऊन प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. ब्रह्मपुरी येथे रुग्णालयात त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तेथील खासगी रुग्णालयात भरती झाले. परंतु दुसऱ्या दिवसापासून श्वसनाचा त्रास वाढू लागला. त्यांची ऑक्सिजन पातळी देखील वेगाने कमी होऊ लागली.

डॉक्टरांना शाश्वती वाटत नसल्याने त्यांनी गडचिरोली किंवा नागपूरला उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ब्रह्मपुरी येथून बोरकर यांना गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत त्यांचा सीटी स्कोअर वाढून १८ वर तर ऑक्सिजन पातळी ७० वर आली होती. त्यांच्या बचावण्याची ९५% खात्री नसल्याने अनेक रुग्णालयांमध्ये बेड नाकारण्यात आला. मात्र, कुटुंबीयांच्या इच्छेखातर दवाखान्यात भरती केलेल्या बोरकर यांनी इच्छेच्या जोरावर व लाडक्या लेकीने ‘पप्पा, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही लवकर घरी परत या… मी तुमची वाट बघत आहे!’ अशी भावनिक साद दिल्यानंतर उमेदीवर कोरोनाला नमवलं आहे.

५ टक्क्याची हमी घ्या आणि उपचार सुरु करा, पत्नीचा आशावाद ठरला मोलाचा !

भंडाऱ्यातील डॉक्टरांनी बोरकर यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर पत्नीने खचून न जाता मोठ्या हिमतीने डॉक्टरांना केवळ ५ टक्के हमी घ्या आणि उपचार सुरू करा, ५ टक्के माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, अशी विनवणी केली. यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, तब्बल ९ दिवस व्हेंटिलेटर व ८ दिवस ऑक्सिजनवर अशा कठीण परिस्थितीत मुलीने फोनवरून दिलेलं बळ, पत्नीची हिम्मत, मित्रमंडळींचा धीर यांनीच अँटीबॉडीचे काम केले आणि कोरोनावर मात झाल्याची प्रतिक्रिया देवानंद बोरकर यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP