मोदींना लोकशाहीची चपराक मारावीशी वाटते : ममता बॅनर्जी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका अंतिम टप्यात येताच मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्या शाब्दिक युद्धाने जोर पकडला आहे. तर आता ‘जय श्री राम’च्या घोषणेवरून या दोन बड्या नेत्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. या वादावरूनच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.आजपर्यंत असा खोटारडा पंतप्रधान पाहिला नाही. निवडणुका आल्या की यांना राम आठवतो, अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि नोटबंदी केली त्यामुळे मोदींना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते, अशी तीव्र प्रतिक्रिया ममता यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी एका सभेत म्हटले होते की, पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम बोलणाऱ्यांना अटक करण्यात येते. राज्यात देवाचं नाव घेण्यास बंदी आहे. त्यावर ममता यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदी पश्चिम बंगालमध्ये आल्यानंतर म्हणतात, तृणमूल काँग्रेस गुंडांचा पक्ष आहे. त्याचवेळी मनात आले की, मोदींनी जोरदार चपराक ठेवून द्यावी. मोदींना त्याची गरज आहे. आजपर्यंत असा खोटारडा पंतप्रधान पाहिला नाही. निवडणुका आल्या की यांना राम आठवतो, अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि नोटबंदी केली, अशी घणाघाती टीका ममता यांनी केली.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी स्वत:ला विकून राजकारण करत नाही. आपण कुणालाही घाबरत नसून निडरतेने जगते. पण पंतप्रधान मोदी केवळ दंगे भडकवण्यात आग्रेसर आहेत. धर्माच्या नावावर जनतेत फूट पाडण्यात ते पटाईत आहेत. तसेच जय श्री राम हा भाजपचा नारा आहे. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने हा नारा द्यावा. निवडणुका आल्यावर प्रभू रामचंद्र भाजपचे आणि नरेंद्र मोदींचे एजंट होतात, का असा सवालही ममता यांनी उपस्थित केला.