अटलजी सर्वसमावेशक, ते मोदी सरकारसारखे नव्हते : ममता बॅनर्जी

टीम महाराष्ट्र देशा- भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मागील 48 तासांत त्यांची प्रकृती जास्त खालावली होती.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे राजकारण सर्वसमावेशक होते. त्यांचे राजकारण आत्ताच्या मोदी सरकारसारखे नव्हते अशी टीका तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. मला अटलजींसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. वाजपेयी हे आपल्या देशाच्या उत्तम पंतप्रधानांपैकी एक आहेत असेही ममता बॅनर्जींनी म्हटले आहे, त्यांचे सरकार पडणार होते तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या कामाचे स्वरूप, राजकारणाचे स्वरूप मोदी सरकारपेक्षा कितीतरी वेगळे होते असेही ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.

भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी संध्याकाळी 5.05 मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.

माजी पंतप्रधान, सहृद्यी राजकारणी, सर्वोत्तम संसदपटू भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराचा चालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला अश्या शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली आहे.