fbpx

राहुल गांधीच्या राजीनामा नाट्यानंतर आता ममता बॅनर्जी यांचा राजीनामा

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मोठे यश मिळविले असून विरोधकांची धूळधाण उडविली आहे. विरोधकांमध्ये या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अनेकजण राजीनामा देत आहेत. आज सकाळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे राजनामा नाट्य चांगलेच रंगले. चार तास चाललेल्या या नाट्यानंतर आता तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी राजीनामा पक्षाच्या बैठकीत सादर केला आहे. मला मुख्यमंत्रीपदी राहण्याची अजिबात इच्छा नाही असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

भाजप विरुद्ध तृणमूल असा जो सामना गेल्या काही दिवस बंगालमध्ये पहायला मिळत होता .भाजपने बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारत ममता यांना धोबीपछाड दिला आहे. लोकसभेच्या एकूण 42 जागांपैकी 18 जागा भाजपला मिळाल्या तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 22 जागांवर समाधान मानावं लागलं. 2014 पेक्षा 12 जागा तृणमूलला कमी मिळाल्या.

भाजपने गेल्या निवडणुकीत फक्त 2 जागा मिळवल्या होत्या. त्यांनी मुसंडी मारत ममतांच्या साम्राज्याला सुरुंग लावला. निवडणूक प्रचारादरम्यान मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू होती. आता निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जिव्हारी लागलेल्या पराभवाची जबाबदारी घेत ममता बॅनर्जींनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे.