ममतादीदींचा खेला होबे, भाजपला मोठा धक्का ; मुकुल रॉय यांची घरवापसी

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं मोठं स्वप्न उधळून लावल्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपला एका मागोमाग एक धक्के देत आहेत. या वेळी थेट पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांना तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर त्यांनी आणलं आहे. मुकुल रॉय कोलकात्यात TMC च्या कार्यालयात पोहोचल्याबरोबरच बातम्यांना उधाण आले होते. मुकुल रॉय आणि त्यांचा शुभ्रांशु रॉय दोघांनीही TMC मध्ये प्रवेश केला आहे. मोदी-शहांचा विश्वासू नेता आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद असलेला नेता मुकुल रॉय तृणमूल काँग्रेसमध्ये परतले आहेत.

निवडणूक जिंकल्यानंतर ममतांनी भाजपला दिलेला हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. तब्बल चार वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली आहे. प्रवेशाआधी रॉय यांनी टीएमसी कार्यालयात येऊन ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. यावेळी पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. रॉय यांच्या पक्ष प्रवेशानंतर माजी मंत्री राजीव बॅनर्जी आणि माजी आमदार सव्यसाची दत्ताही लवकरच टीएमसीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

यावेळी ‘घर का लडका घर वापस आया है,’ अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. तसेच बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत कोणीही भाजपमध्ये राहणार नाही. माझा ममतादीदींना कधीच विरोध नव्हता, असं रॉय म्हणाले. तर, आपला पक्ष खूप शक्तीशाली आहे. रॉय यांनी निवडणुकीत कधीही आपल्या पक्षाविरोधात टीका केली नाही, असं सांगतानाच निवडणूक काळात ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली. त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. जे भाजपने केलं. ते आम्ही करणार नाही. भाजप ही सामान्य लोकांची पार्टी नाही. ती एक एजन्सी पार्टी आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

IMP