निवडणूक आयोगावर ममता बॅनर्जी संतापल्या, ‘मोदींना किती नोटीशी पाठवल्या?’

mamta

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुस्लीम मतदारांना एकजूट होण्याच्या आवाहनावर ममता बॅनर्जींना निवडणूक आयोगातर्फे नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांना दामजूरमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभेत निवडणूक आयोगावरच ताशेरे ओढले. ‘मला नोटीस पाठवता, पण आतापर्यंत नरेंद्र मोदींच्या विरोधात आयोगाने किती तक्रारी नोंद केल्या आहेत?’ असा सवाल ममतांनी आयोगाला विचारला आहे.

त्या म्हणाल्या की, माझ्या विरोधात 10 कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात. त्यातली एकसुद्धा खरी नाहीये. मी प्रत्येकाला एकजूट होऊन मतदान करण्यासाठी सांगत आहे. मी कुणामध्ये फूट पाडत आहेत. आतापर्यंत नरेंद्र मोदींच्या विरोधात किती तक्रारी दाखल करण्यात आल्या? ते तर दररोज हिंदू-मुस्लिम करत असतात.

ममता बॅनर्जी यांनी आपल्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगासोबतच भाजप नेत्यांवर देखील निशाणा साधला. ‘नंदीग्रामच्या मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणाऱ्या लोकांविरोधात किती तक्रारी दाखल झाल्या? त्यांना लज्जास्पद वाटत नाही? ते माझ्याविरोधात काही करू शकत नाहीत. मी हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांच्याशिवाय इतर जनजातींच्या देखील सोबत आहे’ असे ममता म्हणाल्या.