माळशिरसची लढाई : मोहिते-पाटील म्हणतील तोच होणार माळशिरसचा आमदार

blank

अकलूज : संपूर्ण राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या पक्षांतरामुळे उमेदवारीची राजकीय गणिते बदलली आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना उमेदवार देताना मोठी कसरत करावी लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील यांचे वर्चस्व असणाऱ्या माळशिरस मतदार संघात उमेदवारीसाठी जोरदार चुरस पहायला मिळत आहे. यामुळे माळशिरस तालुक्यात सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे.

माळशिरस मतदारसंघात मागच्या २० वर्षांपासून मोहिते-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवादपणे वर्चस्व राहिलेले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून म्हणजे 1999 पासून आतापर्यंत प्रत्येक वेळी या मतदारसंघातून राष्ट्रवादी चा उमेदवार विजयी झालेला आहे. 1999 आणि 2004 ला या मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते  पाटील हे विजयी झाले होते तर 2009 आणि 2014 ला या मतदारसंघात स्व. हनुमंत राव डोळस यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा भक्कम बालेकिल्ला मानला जातो.

मागील २०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना देशात अनेक दिग्गज नेते पराभूत झाले होते. त्या वेळी माढय़ात मात्र राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील हे वैयक्तिक करिश्म्याच्या बळावर आपले प्रतिस्पर्धी आणि सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव करून निवडून आले होते. राष्ट्रवादीचा हा गड राखला गेला. माळशिरसमध्ये यावेळी परिस्थिती मात्र वेगळी आहे.मोहिते-पाटील भाजपवासी झाल्याने पारडे अचानक फिरले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. लोकसभाला या मतदारसंघातून भाजपला लक्षणीय मताधिक्य मिळाले होते. मोहिते पाटलांवर जनतेचा विश्वास कायम असल्याचे यातून दिसून आले त्यामुळे या मतदारसंघात मोहिते पाटील म्हणतील तोच उमेदवार या मतदारसंघात असेल हे स्पष्ट आहे.

माळशिरस मधून भाजपकडून उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक आहे. यात जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन धाइंजे आणि डॉ. विवेक गुजर यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. माळशिरसमधून भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी पंचायत समितीचे सदस्य अजय सकट, माळशिरस तालुका पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष संतोष ताटे, स्व. हनुमंतराव डोळस यांचे चिरंजीव संकल्प डोळस, पालकमंत्र्यांचे समर्थक अतुल सरतापे, बोरगावचे भीमराव साठे, राम सातपुते, उघडेवाडीचे धनंजय साठे यांच्यासह अनेक नेते उत्सुक आहेत.

डॉ. गुजर हे तालुक्यात आपल्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून घराघरात पोहचले आहेत. त्यांना उमेदवारी देऊन मोहिते-पाटील सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी देखील माळशिरस मतदारसंघात चाचपणी केल्याचे समजते पण संघ या नावाला किती स्वीकारले या बाबत दाट शंका आहे.दरम्यान, माळशिरस तालुक्यातून युतीला लाखापेक्षा अधिक मतांचे लीड मिळालं आहे .त्यामुळे माळशिरस तालुल्याचा आमदार हा तालुक्यातीलच असला पाहिजे अशी भूमिका सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे आयात उमेदवारी कार्यकर्ते स्वीकारणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वरील नावांपैकी उमेदवारी कुणाच्या गळयात पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या