मलकापूर नगरपरिषद निवडणूक : कॉंग्रेसकडे बहुमत

टीम महाराष्ट्र देशा – लागलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत एकूण १९ जागांपैकी ११ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर पाच ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना यश मिळाले आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजप नेते अतुल भोसले यांची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये चव्हाण यांनी बाजी मारत मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत प्राप्त करून दिले आहे.
नगराध्यक्षपदासाठीही काँग्रेस उमेदवार नीलम धनंजय येडगे आघाडीवर आहेत. त्यांना १०५ मतांची आघाडी मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे.

मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत असल्याचे पाहायला मिळाले. पण नंतर काँग्रेसच्या बहुतांश उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आणि ती कायम ठेवली.

पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांच्या पॅनेल विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुकीच्या प्रचारावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले हे दोघेही कराडमध्ये तळ ठोकून होते. ९ प्रभागांत १९ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. तर नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत.