वाळूज परिसराला स्वतंत्र महापालिका करा

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी परिसरातील ग्राम पंचायत औरंगाबाद महापालिकेत समावेश करण्याच्या हालचाली चुकीच्या आहे. या परिसराचा विकास करण्यासाठी शासनाने एकदा पाहणी करून स्वतंत्र महापालिका करून विकास करावा. यापूर्वी अनेक ग्रामपंचायत औरंगाबाद महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. त्यांचा अद्याप विकास झालेला नाही. त्यामुळे वाळूज परिसराचा महापालिकेत समावेश करू नये. असे केल्यास कृतीसमिती तयार करून शेवट पर्यंत विरोध करणार असे मत वडगाव कोल्हाटी येथिल सरपंच सचिन गरड यांनी व्यक्त केले. यावेळी वाळूजच्या सरपंच सईदा पठाण यांनी महापालिकेत समाविष्ट करण्याला विरोध असल्याचे सांगितले.

आपली महानगर पालिका ‘क’ दर्जाची असून वाळूज एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायत महानगर पालिकेत समाविष्ट करण्यात आल्या तर सध्या महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांना सुविधा न देऊ शकणाऱ्या महानगर पालिकेवर प्रचंड बोजा निर्माण होईल आणि परिणामतः प्रशासन विकास करण्यास असमर्थ ठरेल. हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही मोठ्या संख्येने एकत्र येऊन विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा कडून निर्णय मागे घेण्यास भाग पाडू.
रमेश गायकवाड, जिप सदस्य पंढरपूर

वाळूज एमआयडीसी परिसरातील काही ग्रामपंचायतींना औरंगाबाद महानगर पालिकेत समाविष्ट करण्यासाठी शासन स्तरावरून हालचाली सुरु आहे, याचा स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध आहे. आम्ही परिसरातील ग्रामपंचायत मिळून वाळूज महानगर कृती समिती स्थापन करणार आहोत आणि त्यामार्फत आम्ही स्वतंत्र नगरपंचायत किंवा नगरपरिषद ची मागणी करणार आहोत. आमच्या उत्पन्नावर शहराचा विकास केला जाईल हे आम्हाला कदापि मान्य नाही.
दीपक बडे, पंचायत समिती सदस्य, रांजणगाव शेपू

एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायती जर मनपा हद्दीत घेत असेल तर त्यामार्फत उद्योजकांना सेवा पुरवण्यात आल्या पाहिजे. याठिकाणी मनपा कर वसूल करते परंतु सेवा पुरवीत नाही. पिंपरी चिचंवड, चाकण यासारख्या ठिकाणी स्वतंत्र पालिका प्रशासन असल्याने प्रशासन उद्योजकांना सहकार्य करते, त्यासारख्या सुविधा देण्यासाठी एमआयडीसी परिसराला वेगळी नगरपालिका किंवा नगरपरिषद झाल्यास आम्हाला ती नक्कीच आवडेल.
मनीष अग्रवाल, उद्योजक

महत्वाच्या बातम्या