‘उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा!’ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे धक्कादायक वक्तव्य

पुणे : कोरोना संसर्गाच्या काळात सक्षमपणे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील प्रमुख १३ राज्यांत सर्वेक्षण घेतले असून त्यात इतर मुख्यमंत्र्यांना मात देत उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय ठरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. ‘उद्धव ठाकरे हे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरलेत, त्यामुळे त्यांना पंतप्रधान करा’ असे वक्तव्य चव्हाण यांनी केले.

इंधन दरवाढीच्या विरोधात आणि मोदी सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने पुणे शहरात आज आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सायकल रॅली, रस्त्यावर चूल मांडून घोषणाबाजी केली. यानंतर चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘कोरोनामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला असतांना पेट्रोल डिझेल आणि गॅसवर करवाढ करून दरवाढ केली आहे. केंद्राच्या धोरणामुळे सातत्याने दरवाढ झाली आहे. राज्यात कर मात्र स्थिर आहे. मोदी सरकारने सरकार स्थापनेपासून ३२ ते ३५ लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. त्याचा तोटा भरुन काढण्यासाठी कर वाढ केली जात आहे.

मोदी सरकार हा तोटा भरून काढण्यासाठी कर्ज तर काढतंय. त्याचबरोबर देशातल्या बँका विकणं, कंपन्या विकणं, एलआयसीचे खासगीकरण करणे असेही प्रकार सुरू आहेत. हे सर्व अत्यंत निंदनीय काम सुरु आहे. काँग्रेसने जे कमावलं ते मोदी सरकारने गमावलं. कंबरतोड करणारी इंधन दरवाढ केंद्राने मागे घ्यावी असे त्यांनी सांगितले.

तर उद्धव ठाकरे चांगले काम करत असल्याचं नमूद करत ते लोकप्रिय ठरल्याचे सांगितले. तसेच उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा, असंही मत नोंदवलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. ठाकरे यांना पंतप्रधान करा म्हटल्याने चव्हाण यांना राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाचा विसर पडला की काय? असा प्रश्न विचारला जात आहे. यावरुन सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या