“बेटी बचाओ बेटी पढाओ” अभियान अधिक प्रभावशाली करा – डॉ.राजेंद्र फडके

नाशिक : “बेटी बचाओ बेटी पढाओ” उपक्रम करण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृतीची गरज असून त्यासाठी भाजपा कार्यकर्ते आणि विशेषत: महिलांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन या उपक्रमाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी केले.भारतीय जनता पार्टीच्या नाशिक महानगर शाखेतर्फे वसंतस्मृती कार्यालयात कन्यापूजन, डॉक्टरातर्फे जनजागृती कार्यशाळा आदींमार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमास चालना देण्याचे प्रयत्न व्हावेत. शाळेमध्ये मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढत असून ते रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलींचे स्वागत करावे. एक मुलगी असणाऱ्या पालकांचाही सन्मान करावा. नाशिक महानगरात गणेशोत्सवाचे औचित्य साधून नाशिक कन्यारत्न पुरस्कार देण्याची योजना सुरु करावी अशा सूचनाही डॉ.फडके यांनी केल्या.माझी कन्या भाग्यश्री सह विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन सुनिल बढे यांनी आपल्या भाषणात केले. स्त्रीभृण हत्या थांबविण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती करण्याची गरज अस्मिता पाटील यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केली. महिलांना समानतेचा दर्जा हवा असे आवाहनही त्यांनी केले. बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी महानगरात मुलींची रॅली काढण्याची सूचनाही त्यांनी केली. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समुपदेशन केंद्र सुरु करता येईल का याचा गांभीर्याने विचार व्हावा असे लक्ष्मण सावजी म्हणाले. बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम महानगरात प्रभावशाली राबविला जाईल, असे महानगर अध्यक्ष आ.बाळासाहेब सानप यांनी सांगितले. याबाबत लवकरच ३४ नगरसेविका, दोन महिला आमदार आणि १० प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात येईल, असेही ते पुढे म्हणाले. महापौर रंजना भानसी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रेरणा बेळे यांनी केले. यावेळी नगरसेवक व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते