‘पैज लावतो ! राहुल आणि प्रियांका गांधी यांनी कधी रक्षाबंधनचं केले नाही’

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेते कुठे काही बोलतील याचा अंदाज लावणे कठीण आहे. अशाच एका भाजप नेत्याने अनोखी पैज लावली आहे. राहुल-प्रियंका गांधी यांचा रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा अन् बक्षिस घेऊन जा अशी पैज भोपाळ भाजप आ. विश्वास सांरग यांनी लावली आहे. शुक्रवारी भोपाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात आमदार विश्वास सांरग बोलत होते. यावेळी सारंग यांनी मुख्यमंत्री कमलनाथ आणि राहुल गांधी यांच्यासह नेहरु गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली आहे.

यावेळी सारंग म्हणाले की, काँग्रेस नेते कधीही रक्षाबंधन साजरा करत नाहीत. ते लोक इटलीची प्रथा मानतात.इटलीची प्रथा-परंपरा, संस्कृती आत्मसात करणारे सत्तेत आल्यास असेच चित्र पाहायला मिळेल. रक्षाबंधन हा सण हिंदू संस्कृतीशी जोडला आहे. त्याच्याशी काँग्रेस नेत्यांना काहीही देणंघेणं नाही. हे लोक फक्त राहुल गांधी आणि सोनिया गांधी जे सांगतील तेच करणारे आहेत.

तसेच राहुल-प्रियंका गांधी यांचा रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा अन् बक्षिस घेऊन जा. या प्रकारचा कोणता फोटो मी अद्याप बघितला नाही. जर तुमच्यापैकी कोणी असा फोटो बघितला असेल तर फोटो मला दाखवा, मी तुम्हाला बक्षिस देईन असे सारंग म्हणाले. भाजपाच्या कार्यकाळात शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री असताना त्यांच्या निवासस्थानी मोठं आयोजन केलं जात होते. मोठ्या संख्येने महिला मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी यायच्या. मात्र काँग्रेसच्या काळात असा कोणताही उत्साह, जल्लोष पाहायला मिळत नाही, असा टोला सारंग यांनी लगावला.