पुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

blank

पुणे/ खडकवासला – जम्मू- काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी शुक्रवारी घडविलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशिधरन नायर यांच्यासह एक जवान हुतात्मा झाला. लष्कराच्या फर्स्ट गोरखा रायफल्समध्ये ते कार्यरत होते.

रविवारी शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या शहीद सुपुत्राला अखेरची मानवंदना देण्यासाठी पुणेकरांनी वैकुंठ स्मशानभूमीत गर्दी केली. अमर रहे, अमर रहे, शशीधरन नायर अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. लष्कराच्या पथकाने संगिनींच्या फैरी झाडत या वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला

राजौरीमधील नौशेरा भागातील रूपमती आणि पुख्खरणी या ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडीच्या स्फोटात नायर यांच्यासह रायफलमन जवान गुरूंग हे हुतात्मा झाले.

नायर यांच्या हौतात्म्यने संपूर्ण खडकवासलावर शोककळा पसरली आहे. अंत्यसंस्कारावेळी खडकवासला येथील नायर यांच्या घराजवळ ग्रामीण पोलीस दलातील जवान , लहान मुले, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. शिवाय पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, आमदार भीमराव तापकीर, खडकवासलाचे सरपंच सौरभ मते हेही उपस्थित आहेत.