गोंदियातील ‘बिंदल थाट’ हॉटेलमध्ये आग; सातजणांचा मृत्यू

गोंदिया : गोंदिया शहरातील बिंदल थाट हॉटेलला मोठी आग लागली आहे. पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली असून सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या आगीमुळे सात व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 25 ते 30 खोल्यांचं हे निवासी हॉटेल आहे. यापैकी पाचजणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलंय.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हॉटेलमध्ये आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता असून एका व्यक्तीचा मृतदेहही सापडला आहे. हे हॉटेल मुख्य बाजारपेठेत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते. आगीमुळे 8 ते 10 सिलेंडर ब्लास्ट झाले आहेत, तर आणखी काही सिलेंडर आत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आग कशी लागली याचे नेमके कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसले तरी सिलिंडरच्या स्फोटामुळे किंवा शॉकसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शहरातील गोरेलाल चौक येथील झी बाजाराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग पसरत जाऊन शेजारीच असलेल्या हॉटेल बिंदलपर्यंत पोहोचली. झी बाजारात मोठ्या प्रमाणात कापड असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रुप धारण केले.  आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गोंदिया, तिरोडा, देवरी, तुमसर, भंडारा आणि बालाघाट येथून फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले होते.