नांदेड : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी रात्री गोदावरी नदीच्या काठावर पथकासह धाड टाकून वाळू माफियांवर धाडसी कारवाई करत वीस वाहने जप्त केली आहे. या मोठ्या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. यावेळी नांदेडचे उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण यांच्यासह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहून वाळू माफियांनी नांदेड तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी अवैध वाळू उपसा सुरू केला असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी बुधवारी सायंकाळी सहा वाजता महसूल अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलिस व आरटीओ विभागाला बोलावून अचानक छापे टाकून कारवाई केली.
नांदेड शहरालगत गोदावरी नदी काठावर असलेल्या थुगाव, बोंढार, पिंपळगाव कोरका या गावांना भेटी देऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पथकाने कारवाई केली. या कारवाईत १५ टिप्पर, तीन जेसीबी आणि दोन पोकलेन जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात एकूण २०२ वाळू घाट असून त्यापैकी देगलूर, बिलोली आणि माहूर तालुक्यातील एकूण ३२ वाळू घाटांच्या ई – लिलावाची प्रक्रिया नवीन वर्षात ता. दोन जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती. सदरील प्रक्रिया ता. १७ जानेवारीपर्यंत चालणार आहे. वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे वाळू माफिया शांत राहतील, असे वाटत असतानाच दुसरीकडे पुन्हा एकदा वाळू माफियांनी डोके वर काढले आहे. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी धडाकेबाज कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना प्रतिबंधक लस लातुरात दाखल ; शनिवारपासून लसीकरण
- थोरातांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल सर्व राज्यांसाठी उपयुक्त; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
- ‘माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी बाबासाहेबांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार’
- नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यापीठ परिसरात रोषणाई
- डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, आता ‘या’ पदाचा कार्यभार सांभाळणार