धर्मवीरांसाठी उर्दू, संस्कृत, मोडीचा केला अभ्यास -महेंद्रराजे महाडिक

सोलापूर- धर्मवीर संभाजीराजे अाणि त्यांचा कर्तृत्वाचा इतिहास जाणून घेण्यासाठी उर्दू, संस्कृत आणि मोडी भाषेचा अभ्यास केला. इतिहासकालीन पत्रव्यवहाराचे वाचन त्यामुळेच शक्य झाले. त्यामुळेच शिवपूत्र संभाजी या महानाट्याचे लेखन, दिग्दर्शनाची जबाबदारी पेलता अाल्याचे महेंद्रराजे महाडिक यांनी सांगितले.

वयाच्या दहाव्या वर्षापासून बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा महानाट्यात विविध भूमिका बजावल्या. शिवचरित्राने भारावल्याने बाबासाहेब पुरंदरे, आ. ह. साळुंखे, डाॅ. जयसिंगराव पवार, विश्वास पाटील यांचे मार्गदर्शन घेत संभाजी महाराजांबद्दल हे महानाट्य निर्मितीचा ध्यास घेतला. शिवशंभू महानाट्यासाठी लेखन करण्यातच सात वर्षे गेली. हा १११ वा प्रयोग. नाटक साकारण्यासाठी भालजी पेंढारकरांचे काही मराठी चित्रपट तसेच सूर्यकांत आणि चंद्रकांत मांढरे यांनी केलेल्या अनेक भूमिका समजावून घेतल्या.

प्रत्येक कलावंताची वेशभूषा, कलाकारी यावर परिश्रम घेतले. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या नंतर ८०० मीटरचा समुद्रसेतु केवळ धर्मवीर संभाजी महाराजांनी बांधला हे त्रिकालाबाधित सत्य आहे. भविष्यात छत्रपती संभाजी यांच्याप्रमाणेच वीर महाराणा प्रताप यांच्यावरील महानाट्य रंगमंचावर अाणण्याचा मानस असल्याचे महाडिक यांनी सांगितले.