महावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण

मुंबई : महावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा’ या योजनेमध्ये वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना मागील ३ वर्षांत सुमारे ४१ लाख रुपये रोख रक्कम म्हणून बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे.

वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे वीजचोरीविरुध्द सातत्याने मोठ्या प्रमाणात मोहिमा राबविण्यात येत असतात. तरी देखील काही वीजग्राहक नवनवीन युक्त्या वापरून विजेची चोरी करीत असतात. अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरुपात बक्षीस म्हणून देण्यात येते. वीजचोरी करणाऱ्या ग्राहकाने तडजोड रकमेसह वीजचोरीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच बक्षीस देण्यात येत असून माहिती देणाऱ्याचे नाव देखील गुप्त ठेवण्यात येत असते.

२०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षात अशा स्त्रोतांद्वारे वीजचोरीच्या ३६ ठिकाणांची माहिती मिळाली. या ठिकाणी महावितरणच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत सुमारे ४ कोटी १० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली असून ही संपूर्ण रक्कम वीजचोर ग्राहकांकडून वसूल करण्यात आली आहे. योजनेनुसार या वीजचोरीची १० टक्के रक्कम माहिती देणाऱ्याला रोख स्वरूपात बक्षीस रुपाने देण्यात आली आहे.

या संदर्भात व्हिडीओ कॉन्फर्सिंगमध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी ज्या भागात जास्त वीजचोऱ्या आहेत, त्या भागात भरारी पथकाने सातत्याने भेटी द्याव्यात आणि स्थानिक जनतेच्या सहकार्याने वीजचोरांविरूध्द कारवाई करावी, असे निर्देश दिले. महावितरणने वीजचोरी पकडण्यासाठी सर्व मंडलस्तरांवर भरारी पथकांची स्थापना केली आहे. या भरारी पथकाद्वारे वीजचोरीविरुध्द सातत्याने मोहिमा राबविण्यात येत असतात.

मोदी-फडणवीस यांच्या हाती अर्थव्यवस्था असुरक्षित