विदर्भाबद्दल महाविकासआघाडी सरकारच्या मनात राग आहे – देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

भंडारदरा : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा आंदोलनाचा ठरत आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात भाजप वगळता सर्व पक्षांनी पाठींबा देत आंदोलनात सहभाग घेतला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारो शेतकरी हे आझाद मैदानात एकवटले होते. यानंतर, राजभवनावर मोर्चा काढण्यात आला असता पोलिसांनी या मोर्चाला अडवले. काही काळ संघर्ष देखील झाला.

दुसरीकडे, महाविकास आघाडीविरोधात भाजपने विदर्भात आंदोलन पुकारले आहे. भाजपच्या आंदोलनावेळी सभेत बोलताना विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवल्याचे दिसून आले आहे. वीजबिल, विदर्भाला दिली जाणारी वागणूक, भंडारा दुर्घटना, यासह राज्यातील इतर प्रश्नांवरून फडणवीसांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी महाविकास आघाडी विदर्भासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. ‘विदर्भाबद्दल महाविकासआघाडी सरकारच्या मनात राग आहे. समृद्धी महामार्गाची पाहणी करायची होती म्हणून मुख्यमंत्री पहिल्यांदा विदर्भात आले. या सरकारने विदर्भातील प्रकल्प बंद केले. विदर्भाला पैसे मिळायचे ते वैधानिक महामंडळही बंद केलं,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तर, ‘सामान्य नागरिकांना वीजबिल माफी देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत. मग या सरकारने मुंबई व पुण्यातील बिल्डरांना प्रीमियममध्ये सूट देण्यासाठी 5 हजार कोटी रुपये कुठून आणले ? कोणत्याही गावात अधिकारी वीज जोडणी तोडण्यासाठी आल्यास त्यांना गुलाबाचं फुल द्या आणि गाडीत बसून परत पाठवा’ असं गांधीगिरीचं आवाहन देखील फडणवीसांनी यावेळी केलं आहे. तर, ‘कुणाचीही वीज कापण्याची सक्ती कुणाला करू देणार नाही, ही जबाबदारी भाजपाच्या कार्यकर्त्यांची आहे,’ असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या