अयोध्येतील जमीन खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला झोडपून काढले

ram mandir

पुणे – राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र, हे आरोप ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून फेटाळले. खुल्या बाजारातील किमतीपेक्षा कमी दराने ट्रस्टने जमीन खरेदी केली असून, राजकीय द्वेष पसरवण्यासाठी बिनबुडाचे आरोप होत असल्याचा दावा चंपत राय यांनी निवेदनाद्वारे केला.

दरम्यान, या या आरोपांमुळे आणि निर्माण झालेल्या वादामुळे भाजपला झोडपण्याची संधी विरोधकांना मिळाली असून केवळ केंद्रातीलच नव्हे तर राज्यातील नेत्यांनी देखील भाजपवर हल्ला चढवला आहे. शिवसेना,कॉंग्रेस,राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी भाजप,संघ आणि विहिंपवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रामाच्या नावावर लोकांच्या भावनेशी खेळून चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलेला आहे, काँग्रेस ने जानेवारी महिन्यात जनतेची लूट होऊ शकते हा दिलेला धोक्याचा इशारा योग्य ठरला आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. रामाच्या नावावर राजरोसपणे लोकांच्या भावनेशी खेळून अशा घोटाळ्यांवर प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही, हिंदूविरोधी ठरवून आपल्या काळ्या धंद्यावर पांघरून घालण्याचा हा प्रकार आहे. हा प्रकार रामभक्तांचा अपमान करणारा असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी हीच आमच्या सारख्या रामभक्तांची मागणी आहे, असेही सावंत म्हणाले.

तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेने देखील या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले.  राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल असे शिवसेनेनं म्हटले आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून अयोध्येतील राम मंदिर निर्मितीबाबत अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीही अयोध्येतील राम मंदिर जमीन खरेदी घोटाळ्या संबंधी होत असलेल्या आरोपावर देखील भाष्य केले. पवार म्हणाले, जनतेने राम मंदिरासाठी हातभार लावला आहे. एवढा मोठा आरोप होत असेल तर वस्तुस्थिती जनतेला कळायला हवी असे ते म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडी शिवाय एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. राम मंदिराचे नाव पुढे करून मोदींनी त्यांची झोळी भरली, परंतु त्याचा हिशोब आता द्यावा लागणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद हे रामाच्या नावाने मत मागतात. मोदींनी देशातील ज्या भाविकांकडून मंदिर निर्माणासाठी पैसे घेतले, त्या पैशांबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे मंदिर निर्माण होण्याआधीच त्यात भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आहे. त्यामुळे मोदींनी हिशोब देणे गरजेचे असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP