‘मुंबईकरांना छळण्यात महाविकास आघाडीला आनंद मिळतो’ ; भाजपचा हल्लाबोल

upadhey

मुंबई : मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरी प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकर २ ऑगस्ट पासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरु करतील असा इशारा भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिला होता. परंतु काही कारणास्तव भाजपने हे आंदोलन आज केले नाही. परंतु आता आंदोलन न केल्याने कॉंग्रेस नेते व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे.

ब्रिटिशांवरुद्ध केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनातून भाजपने पळ काढला होता. भाजप तेव्हाही प्रामाणिक नव्हता आणि आताही नाही अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. भाजपचा दुटप्पीपणा ओळखून असलेली जनता आज भाजपसोबत नसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आहे. भाजप जनतेच्या जीवावर आंदोलन करणार होते भाजपमध्ये एकट्याने आंदोलन करण्याची क्षमता नाही असा घणाघातही सचिन सावंत यांनी भाजपवर केला आहे.

आता सावंतानी केलेल्या या टीकेवर आता केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत सावंत यांना प्रत्युत्तर दिलं असून, यातून लोकांना छळण्यात तुम्हाला आनंद मिळत असल्याचंच दिसत आहे, अशा शब्दात उपाध्ये यांनी टीकास्त्र डागलं आहे. ‘धन्यवाद. तुम्ही ट्वीट केल्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसला सामान्य मुंबईकरांना छळण्यात कसा विकृत आनंद मिळतो हे दिसले. आम्ही योजना बदलली आणि पितळ उघडं पडलं. सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरून काल हायकोर्टाने थापडा मारल्या तरी तुमच्या सरकारला जाग आली नाही’, असा उलट सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

‘लोकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांना छळायचे आणि आंदोलनं झाली की, मजा बघायची असा उरफाटा कारभार आहे. आंदोलन तर होईलच. सामान्य मुंबईकरांच्यासाठी. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून मिरवता, पण सामान्य मुंबईकराच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी कुचेष्टा करता हेही जनता पहाते आहे’, असा इशाराही उपाध्ये यांनी काँग्रेसला दिला.

महत्वाच्या बातम्या