राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानंतर आता चर्चा फक्त पवारांनी भुजबळांना दिलेल्या पगडीची

पुणे : पुण्यातील कार्यक्रमात पेशवेकालीन पगडीने स्वागताची परंपरा आहे. मात्र शरद पवारांनी त्याला फाटा देत, यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करावे असं म्हंटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील वर्धापन दिनानिमीत्त आयोजित मेळाव्यात पगड्यांची जोरदार चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही तर फुले पगडीनेच स्वागत करायचं, असा आदेश दिला. या कार्यक्रमात शरद पवारांनी छगन भुजबळांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पगडीने सत्कार केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद पवार यांचे स्वागत पुणेरी पगडीनेच झाले. त्यानंतर उशिरा मंचावर आलेल्या भुजबळांचे स्वागतही पुणेरी पगडीने झाले. मात्र, भुजबळांच्या भाषणानंतर जेव्हा शरद पवार भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा त्यांनी महात्मा फुलेंच्या पगडीने त्यांचा सत्कार केला. शिवाय राष्ट्रवादीच्या यापुढच्या सभा आणि मेळाव्यांमध्ये याच पगडीचा वापर करण्याचा सल्लाही शरद पवार यांनी आयोजकांना दिला.