‘अपघातांचे महास्पॉट’, औरंगाबादेत उड्डाणपूलांवरील खड्डयातून गाड्यांचे उड्डाण

roads

औरंगाबाद : शहरात ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य कायम आहे. मात्र आता औरंगाबादकरांना यांची चांगलीच सवय झाली आहे. खड्डयांनुसार आपल्या वाहनाचा वेग कमी-जास्त करण्यात औरंगाबादकर चांगलेच पटाईत झाले आहेत. मात्र रस्त्यांवर खड्डे असण्यासोबतच शहरातील महामार्ग समजले जाणाऱ्या उड्डाणपूलांवर देखील मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. या उड्डाणपुलावर वरील खड्ड्यांमधून गाड्या उड्डाण घेतात. हे फक्त खड्डे नसून अपघाताचे ‘महास्पॉट’ बनले आहेत. उड्डाणपूलांवरुन जातांना मधोमध असणाऱ्या या खड्ड्यांमुळे शहरवासीयांचे प्राण संकटात आहेत. मात्र प्रशासनाला याच्याशी कुठलेही सोयर-सुतक नसल्याने नागरिकांना नाक दाबून बुक्क्यांचा नव्हे खड्ड्यांचा मार सहन करावा लागत आहे.

औरंगाबाद शहरातील रहदारी सुरळीत व्हावी यादृष्टीने मनपाच्या वतीने शहरातील काही मुख्य रस्त्यांवर उड्डाणपूल बांधण्यात आलेले आहेत. हि जमेची बाब असली तरी या उड्डाणपुलांची आजमितीला पुरेशी काळजी न घेतल्याने त्यांची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सेव्हन हिल उड्डाणपुलावर रस्त्याच्या मधोमध एक खड्डा तयार झाला आहे. काही सुज्ञ नागरिकांकडून या खड्याला बुजवण्यात आले होते.

मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा हा खड्डा उघडा पडला आहे. क्रांती चौकाकडे वरती जातांना लागणाऱ्या उड्डाणपुलावर देखील भरमसाठ खड्डे पाहायला मिळतात. जिल्हा न्यायालयाकडून क्रांती चौकाच्या दिशेने जातांना लागणाऱ्या उड्डाणपुलावर सुरूवातीलाच भलामोठा खड्डा तयार झाला आहे. चार खड्डयांचा मिळून एकच खड्डा आहे. आणखी पुढे जाताच आणखी एक खड्डा तुमचे स्वागत करायला तयारच आहे. अनेक वर्षांपासून झालेल्या या खड्डयांवर गट्टूंनी मलमपट्टी करण्याचा प्रयत्न मात्र फसला आहे.

उड्डाणपुलांवर टिम खड्डे

मुकुंदवाडी, क्रांती चौक, आकाशवाणी उड्डाणपूलावर एक खड्डा नसून खड्ड्यांची एक भली मोठी टिमच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे खड्डे कायम आहेत. एकापाठोपाठ असलेल्या या खड्डयांवर गट्टूंचे पॅचवर्क करण्यात आले आहे. मात्र योग्य पद्धतीने हे पॅचवर्क पूर्ण न केल्याने अनेक गट्टू उखडून वरती आले आहेत. वाहनांसाठी ते आणखीनच धोकादायक झाले आहेत.

मोडकळीस आलेले डिव्हाइडर्स, घाणीचे साम्राज्य

औरंगाबादमध्ये बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक, सेव्हन हिल, मुकुंदवाडी अशा विविध ठिकाणी उड्डाणपूल आहेत. या पुलांची योग्य काळजी घेतली न गेल्याने पुलासंबंधी विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मोठेमोठे धोकादायक खड्डे तर आहेतच शिवाय मोडकळीस आलेले डिव्हायडर, अनेक ठिकाणी तर डिव्हायडरच नाही, कडेला साचलेला कचरा, घाणीचे साम्राज्य, डिव्हायडर्सचे वाकलेले धोकादायक खांब या सर्वांमुळे उड्डाणपुलांची चांगलीच शोभा झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या