स्वच्छता आणि हागणदारीमुक्तीच्या क्षेत्रात महाराष्ट्राचे कार्य देशात अग्रेसर

मुंबई : हागणदारीमुक्ती, स्वच्छता या क्षेत्रात महाराष्ट्राचे काम देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार काढत केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वर अय्यर यांनी राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्यासह या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

स्वच्छ भारत अभियानाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय सचिव श्री. अय्यर यांनी आज मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यावेळी उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याबद्दल अभिनंदन करतानाच हागणदारीमुक्त गावांचे प्रमाणीकरण जूनअखेरपर्यंत पूर्ण करावे, अशी सूचना केंद्रीय सचिव श्री. अय्यर यांनी यावेळी केली. संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याने देशासमोर आदर्श निर्माण झाल्याचे सांगत स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याच्या कामात महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचा उल्लेख श्री. अय्यर यांनी यावेळी केला.

You might also like
Comments
Loading...