fbpx

खो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम

पुणे : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुली, तसेच १७ वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात अपराजित्व राखले आणि खो खो मध्ये बाद फेरीसाठी आव्हान राखले.

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया ही स्पर्धा सुरु आहे. प्रेक्षकांच्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरु असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राने पूर्वार्धात २०-४ अशी आघाडी घेतली होती. तेव्हांच पराभव मान्य करीत तामिळनाडूने सामना सोडून दिला. महाराष्ट्राकडून संकेत कदम (नाबाद तीन मिनिटे व एक गडी), अरुण गुणके (२ मि.५० सेकंद व ३ गडी) व मिलिंद कुरपे (तीन गडी) यांंनी उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्राचा साखळी गटात हा सलग दुसरा विजय आहे.

मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने दिल्लीचा १२-७ असा एक डाव पाच गुणांनी पराभव केला. त्याचे श्रेय निकिता पवार (३ मिनिटे व एक गडी), प्रियंका भोपी (५ मिनिटे व एक गडी), अपेक्षा सुतार (२ मिनिटे व २ गडी) यांनी कौतुकास्पद खेळ केला. दिल्ली संघाकडून नसरीन हिने एक मिनिट ४० सेकंद व २ गडी असा खेळ करीत एकाकी लढत दिली. याच वयोगटात पूर्वार्धात एक गुणाने पिछाडीवर असलेल्या गुजरात संघाने तामिळनाडू संघास १४-१४ असे बरोबरीत रोखले. त्याचे श्रेय प्रिया बेन व गंगादेवी यांच्या अष्टपैलू खेळास देता येईल. तामिळनाडूच्या बी.रिशिका व बी.अरुणा यांचे प्रयत्न उल्लेखनीय होते. पंजाबने याच वयोगटात सलग दुसरा विजय नोंदविला. त्यांनी कर्नाटक संघाला ९-७ असा एक डाव दोन गुणांनी पराभवाचा धक्का दिला. त्यांच्याकडून हरमानप्रीत कौर व कमलजित कौर यांच्या अष्टपैलू कामगिरीस द्याावे लागेल.

मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने सलग दुसरा विजय नोंदविताना दिल्ली संघाचा १४-९ असा एक डाव पाच गुणांनी पराभव केला. त्या वेळी महाराष्ट्राकडून दिलीप खांडवी (२ मि.२० सेकंद व ३ गडी), ह्रषिकेश जोशी (नाबाद ३ मि.१० सेकंद व ३ गडी), रोहन कोरे (२ मि.२० सेकंद व ३ गडी) यांनी महत्त्वाची कामगिरी केली. दिल्ली संघाच्या सतीश व अजयकुमार यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने तामिळनाडू संघाचा १३-९ असा पराभव केला.यावेळी महाराष्ट्राकडून सृष्टी शिंदे (२ मि. २० सेकंद), किरण शिंदे (३ मि.), रितीका मगदूग (३ गडी) यांनी सुरेख कामगिरी केली.