महाराष्ट्राचे मिनी काश्मीर ‘तापोळा’

टीम महाराष्ट्र देशा : उन्हाळा म्हटलं कि रखरखत ऊन. आणि सुट्ट्यांची धमाल. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की जो तो या सुट्ट्यांचे नियोजन करण्यात व्यस्त होतो, रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या कुटुंबीयांसोबत, मित्र मैत्रिणींसोबत निवांत वेळ घालवणे शक्य नसते. तीच कमी भरून काढण्यासाठी अनेकजण या सुट्ट्यांचा उपयोग करतात. उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणांना सर्वाधिक पसंती दिली जाते. भारतात महाबळेश्वर सारखी अनेक थंड हवेची ठिकाणं आहेत. त्यातीलचं एक अत्यंत लोकप्रिय असे थंड हवेचे ठिकाण म्हणजे तापोळा.

तापोळ्याला मिनी काश्मीर देखील म्हणतात, वास्तवात ते श्रीनगरच्या ‘दल लेक’ तोडीस तोड, डोळ्यांचे पारणे फिटवणारे आहे. तापोळा कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे. जलाशयाची महासागराएवढी व्याप्ती, निळे पाणी, प्रदुषणमुक्त वातावरण आणि काहीशी दमट तरीही आल्हाददायक हवा असे तापोळा परिसराचे वर्णन करता येईल. सर्वात जुने बोट क्लब म्हणून तापोळ्याची ओळख आहे. या निसर्गरम्य ठिकाणाला एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.

कसे जाल तापोळ्याला ?

महाबळेश्वर पासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर तापोळा वसलेले आहे. पुण्यापासून १५० km, मुंबईपासून २९०km, तर साताऱ्यापासून ८०km असे अंतर आहे. बोटिंग करण्यासाठी सुंदर तापोळा तलाव आहे. हा तलाव कोयना धरणातील शिवसागर या विशाल जलाशयाचाच शेवटचा हिस्सा आहे. महाबळेश्वर ला मुक्काम करून तुम्ही सकाळी लवकर तापोळ्याला जाऊ शकता, स्वतःची गाडी असेल तर उत्तमच, आणि नसली तरी तिथे बस आणि प्रायव्हेट गाड्यांची सुविधा  उपलब्ध आहेच.