विधिमंडळात प्रश्न विचारण्यासाठी चालते दलाली? प्रकरणात विरोधी पक्षातील बड्या नेत्याच्या नावाने खळबळ

maharashtra assembly

टीम महाराष्ट्र देशा: लोकशाहीचे सर्वोच्च ठिकाण मानल्या जाणाऱ्या तसेच सामन्य नागरिकांचा आवाज जिथे मांडला जातो त्या विधिमंडळात प्रश्न विचारण्यासाठी दलाली चालत असल्याच खळबळजनक प्रकरण समोर आल आहे. ‘न्यूज १८ लोकमत’ या वाहिनीने या बद्दलचे वृत्त दिले आहे. दरम्यान, या दलाली प्रकरणात राज्यातील काही बड्या नेत्यांची नावे आल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण
वसई –विरारमधील ग्लोबल सिटी प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक असणारे धनंजय गावडे यांनी माहिती अधिकारात माहिती मागवून तब्बल १९ कोटींची सेटलमेंट केल्याची माहिती खुद्द यामध्ये मध्यस्थ असणाऱ्या प्रमोद दळवी नामक व्यक्तीने दिली आहे. याच घोटाळ्या संबंधीचा प्रश्न अधिवेशनात येणार होता. आता हा प्रश्न विचारला जाऊ नये यासाठी २ कोटींची अजून एक सेटलमेंट करण्यात आली. ज्या सेटलमेंटमध्ये विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना ५० लाख रुपये तर आमदार अनंत ठाकूर, राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता, मंत्रालयातील काही अधिकारी आणि वसई विरार महापालिकेतील अधिकाऱ्यांना उरलेले दीड कोटी देण्यात आल्याच दळवी यांनी सांगितल आहे. दरम्यान या सर्व सेटलमेंटबद्दलच्या ऑडियो देखील पुढे आल्या आहेत.

लोकशाहीच मंदिर समजले जाणाऱ्या विधिमंडळात अशा प्रकारे चालत असणाऱ्या दलालीमुळे राज्यातील राजकारणात मोठ वादळ निर्माण झाल आहे. ज्या शिवसेना नगरसेवकाच नाव या संपूर्ण प्रकरणात आघाडीवर आहे त्या धनंजय गावडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत, तसेच राजकीय द्वेषातून सर्व आरोप करण्यात आल्याच गावडे यांनी म्हंटल आहे.

आपल्याला प्रकरण माहितीच नाही
विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. जे कोणी व्यक्ती यामध्ये आपल नाव घेत आहेत त्यांना आपण ओळखत नाही तसेच गरज पडल्यास नार्कोटेस्ट करून घेण्यासही आपण तयार असल्याच मुंडे यांनी सांगितले आहे. आपण या प्रकरणाबद्दल विधिमंडळात निवेदन करणार असून याची कसून चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचही त्यांनी सांगितले आहे.