आनंदवार्ता : मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र अव्वल

टीम महाराष्ट्र देशा- वंशाचा दिवा फक्त मुलगाच असतो हा दृष्टीकोन बदलत असून मुलगी देखील वंशाचा दिवा होऊ शकते हा सकारात्मक विचार महाराष्ट्रात रुजताना पहायला मिळत आहे. वंशाला वारस म्हणून आजवर मुलांना दत्तक घेतलं जायचं मात्र आता पुरुषसत्ताक मानसिकतेतून समाज बाहेर येत असल्याचं पहायला मिळत आहे. मागील सहा वर्षांमध्ये देशभरात दत्तक घेण्यात आलेल्या अपत्यांमध्ये मुलींचे प्रमाण तब्बल ६० टक्क्यांच्या आसपास आहे. अभिमानाची बाब म्हणजे
मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.

२०१७-१८मध्ये महाराष्ट्रात एकूण ६४२ अपत्यांना दत्तक घेण्यात आले. त्यामध्ये मुलींची संख्या ३५३ आहे. महाराष्ट्र राज्य मोठे असल्यामुळे तसंच राज्यात मुलांना दत्तक देणाऱ्या संस्थांचे जाळे बळकट असल्यामुळे राज्यातील दत्तक मुलांची संख्या अधिक असल्याचे ‘कारा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल दीपक कुमार यांनी सांगितले. दत्तकविधानप्रकरणी माहिती अधिकारत दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेला उत्तर देताना ‘चाइल्ड अॅडॉप्शन रिसोर्स अॅथॉरिटी’ (कारा) या संस्थेमार्फत ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली. देशभरात २०१७-१८ मध्ये एकूण ३,२७६ अपत्य दत्तक घेतण्यात आली. यात मुलींची संख्या १, ८५८ इतकी आहे.