fbpx

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने येत्या रविवारी निषेध जागर

Maharashtra Superstition Nirmulan Samiti

पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने येत्या रविवारी (दि. 20 ऑगस्ट) निषेध जागर करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी सात वाजून वीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत कँडलमार्च, निषेध मोर्चा, चर्चासत्र, सादरिकरण, असे विविध कार्यक्रम होणार असून सोशल मिडीयावर ‘जवाब दो’ हा हॅशटॅग चालविला जाणार आहे. अशी माहिती असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमिद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, पुणे शहर कार्याध्यक्ष श्रीपाद ललवाणी आदी या वेळी उपस्थित होते. येत्या रविवारी (दि. २०) डॉ. दाभोलकर यांच्या खूनाला चार वर्षे पुर्ण होणार आहेत. त्यामुळे या दिवशी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अंनिसतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘जवाब दो’ या गीताने निषेध जागरची सुरुवात होणार आहे. सकळी आठ ते दहा या वेळेत विठ्ठल रामजी पुल ते साने गुरुजी स्मारक, पर्वती या दरम्यान निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. महापालिका इमारत आणि लक्ष्मी रस्त्याने हा मोर्चा जाणार आहे.अशोक धिवरे, विद्या बाळ, बाबा आढाव यांची या वेळी भाषणे होणार आहेत. त्यानंतरच्या सत्रात साने गुरुजी स्मारक येथे जावेद अख्तर आणि राजदीप सरदेसाई ‘हिंसा के खिलाफ मानवता री और’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. त्यानंतर विजय, किशोर कदम, मनस्विनी लता रवींद्र आणि अरविंद जगताप ‘हिंसेला नकार मानवतेचा स्विकार ‘ या विषयावर अधारित कथा, कवितांचे अभिवाचन तसेच छोट्या नाटिका सादर करणार आहेत, असे दाभोलकर यांनी सांगितले.