मुंबई: कोरोनाशी दोन हात करतानाच अर्थव्यवस्थेचा रुळावरून घसरत चाललेला गाडा सुरळीत राहावा, यासाठी सरकारने कठोर निर्बंध शिथिल केले होते, पण त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात जी बेपर्वाईची गर्दी उसळली, त्याचेच दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख धक्कादायक तर आहेच, पण तितकाच धोकादायकही आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट मुंबईच्या उंबरठय़ावर धडका मारत आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पुन्हा पूर्वीप्रमाणेच कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखायचे असेल तर महाराष्ट्रालाही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. असा गंभीर इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून दिला आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येचे आठवडाभरापासून वाढणारे आकडे धडकी भरविणारे आहेत. महाराष्ट्र, खास करून मुंबई, दिल्ली, केरळ आणि इतरही राज्यांत दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. कोरोना संक्रमणाची ही वाढती गती चिंताजनक म्हणावी अशीच आहे. मुंबईमध्ये गेल्या आठवडयात कोरोनाबाधितांचे प्रमाण १ टक्क्यापेक्षाही कमी होते. मात्र, मागच्या सात दिवसांत कोरोनाबाधिताचे प्रमाण तब्बल ३ टक्क्यांवर गेले आहे. मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाचे २१७२ रुग्ण आढळले. यापैकी १३७७ रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईतील गेल्या सात महिन्यातील ही सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रसार धोकादायक वळणावर असून राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी 63 टक्के रुग्ण मुंबईत आढळले आहेत.
ज्यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जगभरात हाहाकार उडविला होता त्यावेळी मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या अवाढव्य पसरलेल्या शहराची परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने प्रचंड कष्ट घेतले. धारावीसारख्या दाटीवाटीच्या वसाहतींमध्ये मुंबई महापालिका आणि प्रशासनाने अहोरात्र परिश्रम घेऊन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. धारावीतील कोरोना प्रतिबंधक व्यवस्थापनाचे तर जगभर कौतुकही झाले. त्या तमाम मेहनतीवर पाणी फिरवायचे नसेल तर मुंबई आणि महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची वेळ आता नक्कीच आली आहे. एक आठवडय़ापूर्वी राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या 1 हजारच्या टप्प्यात किंवा त्याहून थोडी अधिक होती. मात्र, चालू आठवडय़ाच्या प्रारंभीच महाराष्ट्रातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजारांचा आकडा ओलांडला. आठवडाभरात कोरोनाची रुग्णसंख्या दुपटीने वाढली आणि रुग्णसंख्येची ही गती अशीच कायम राहिली तर येत्या दोन महिन्यांत राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे, ती चुकीची म्हणता येणार नाही. असे सामनातून म्हटले आहे.
कोरोना तर आता संपलाच आहे, हा फाजील विश्वास आणि त्यातून जनतेने दाखविलेला गाफीलपणा यामुळे कोरोनाच्या विषाणूने आपली मिठी पुन्हा आवळायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या लाटेने उडविलेला हाहाकार आणि नजीकच्या सग्यासोयऱ्यांचे डोळ्यासमोर गेलेले बळी पाहून हादरलेल्या जनतेने कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन सुरू केले होते. तथापि, दुसरी लाट ओसरली आणि तिसऱ्या लाटेचे भय हळूहळू कमी होत गेले, तशी सगळ्यांचीच बेफिकिरी वाढली. कोविडच्या नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू झाले. सरकार आणि प्रशासनाच्या सूचना जनतेने धाब्यावर बसविल्या. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा नियम पायदळी तुडवून लोक गर्दीच्या समारंभात बिनदिक्कतपणे मिसळू लागले. कोरोनाशी लढणारे प्रभावी शस्त्र असलेल्या मास्क नाकाऐवजी गळ्यात अडकवून किंवा केवळ औपचारिकता म्हणून बाहेर बाहेर पडताना मास्क खिशात ठेवण्याकडे लोकांचा कल वाढला. कोविडच्या नियमांची ऐशीतैशी करत बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या. मात्र असेच आताही चालू राहिले तर परिस्थिती गंभीर बनू शकते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला उंबरठयावरच रोखायचे असेल तर महाराष्ट्रालाही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. असा गंभीर इशारा सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तुमचं पत्र बदनामी करणारं; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल कडाडले
- “अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता, लोक म्हणतात फक्त दादा”, रुपाली पाटलांनी केले अजित पवारांचे कौतुक
- क्विंटन डी कॉक खेळणार नाही पुढील दोन कसोटी सामने; ‘हे’ आहे कारण
- …नाहीतर उपमुख्यमंत्री असे तोंडावर आपटले नसते; मनसेचा टोला
- ऋषभ पंतने मोडला महेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम