तिसऱ्या दिवशीही लालपरी बंदच ; एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा धूसर

मुंबई : आपल्या मागण्यावर ठाम असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता काही दिसत नाही. एसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यत रात्री उशिरा झालेल्या बैठकीत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे एसटी संप सुरुच आहे.

एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे हे बैठकीनंतर म्हणाले की, बैठकीत अद्याप तोडगा निघाला नाही. आम्ही सातवा वेतन आणि सेवा जेष्ठतेची मागणी केली होती. यासाठी साडे चार हजार कोटींची मागणी प्रशासनाकडे केली होती. सातव्या वेतनाला मिळता जुळता प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला. यामध्ये 4 ते 7 हजारांची वेतन वाढीचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला. मात्र, त्यातली वाढ कामगारांना मान्य होणार नसल्याने अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. आज परिवहनमंत्र्याच्या बैठकीत पुन्हा चर्चा करुन यावर तोडगा काढून, आम्ही एसटी कर्मचारी संघटना संप मागे घेण्याच्या तयारीत आहोत”

यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, “जास्तीत जास्त वाढ देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये 2.57 हजार कोटींचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. यापुढे सरकारकडून एक रुपयासुद्धा वाढवून दिला जाणार नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटना का अडून बसले हे माहीत नाही. यापुढे कोणताही तोडगा निघणार नसून संप मागे घ्यावा असं मला वाटतं”