तहसीलदार संजय पवारांवर शिस्तभंग कारवाई करा

राज्य माहिती आयोगाची महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे शिफारस

वेबटीम : माहितीचा अधिकार कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी इंदापूरचे तत्कालीन तथा सध्या करमाळ्यामध्ये रुजू असणारे तहसीलदार संजय पवार यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्याची शिफारस महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे करण्यात आली आहे. राज्य माहिती आयोगाने हि शिफारस केली आहे.

इंदापूरमध्ये कार्यरत असताना संजय पवार यांनी माहिती अधिकार कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य माहिती आयोगाकडून लेखी खुलासा करण्याबाबत पवार यांना आदेश देण्यात आले होते. मात्र संजय पवार यांनी आयोगाच्या कोणत्याच नोटीसीला स्वतः उपस्थित राहून अथवा पत्राद्वारे देखील कोणताच खुलासा केला नाही. यावरून पवार यांना माहिती अधिकार कायद्याचा कोणताच आदर नसल्याचा ठपका राज्य माहिती आयोगाकडून ठेवण्यात आला आहे.

यामुळे आता संजय पवार यांना शिस्तभंग कारवाईच्या अनुषंगाने बजावलेल्या नोटीसी संदर्भात त्यांचे काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून. तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पवार यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची शिफारस राज्य माहिती आयोगाने महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.