मंत्रिमंडळ विस्ताराचे लागले वेध; इच्छुकांचे गुढघ्याला बाशिंग

politician chair clipart

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा यामहिना अखेर विस्तार होणार असल्याने भारतीय जनता पक्षातील इच्छुक मंडळींनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी भाजपमधील इच्छुकांनी आपापल्या गॉडफादर मार्फत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा जुलै २०१६ मध्ये विस्तार झाला होता. त्यावेळी सुभाष देशमुख , जयकुमार रावल , संभाजी पाटील निलंगेकर, महादेव जानकर, सदाभाऊ खोत आदींचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता . शिवसेनेच्या वाट्याची मंत्रीपदे त्यावेळी भरली गेली नव्हती . आता सुमारे दीड वर्षांनंतर होणाऱ्या विस्तारात शिवसेनेच्या वाट्याची मंत्रीपदे भरली जाणार का नाही याची उत्सुकता आहे.

शिवसेनेच्या इच्छुक आमदारांनी वेगवेगळया मार्गातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वाट्याची मंत्रीपदे यावेळी तरी भरावी यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. उद्धव ठाकरे या प्रयत्नांना कितपत प्रतिसाद देतात हे पहाव लागणार आहे. तर कॉंग्रेसला सोडचिट्ठी दिलेले नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी या महिनाअखेर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राणे यांना स्थान देण्याबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या काही कॅबिनेट व काही राज्यमंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याचीही जोरदार चर्चा भाजप – शिवसेनेच्या वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे काही मंत्री व राज्यमंत्र्यांचे धाबे दणाणले आहे.

मध्यंतरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही मंत्र्यांच्या तसेच आमदार – खासदारांच्या कामगिरीचा अहवाल मागितला आहे . या अहवालानुसार मुख्यमंत्री फडणवीस हे कोणाला नारळ द्यायचा याचा निर्णय घेतील असे सांगितले जात आहे . मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीस यांनी १६ ऑक्टोबर रोजी अमित शाह यांची अहमदाबाद येथे भेट घेतली होती . ३ तास चाललेल्या या भेटीत प्रामुख्याने मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच चर्चा झाली.

Loading...