सढळ हाताने गुणदान करणाऱ्या शाळांना बसणार चाप

 वेबटीम : अंतर्गत गुणदान पद्धतीमुळे मागील चार-पाच वर्षांत इयत्ता दहावीच्या निकालाचा टक्का प्रचंड फुगत चालला असून टक्क्यांची भरारी घेणारे हेच गुणवंतइयत्ता बारावीनंतरच्या सीईटीत मात्र मागे पडताना दिसत आहेत. ज्या अंतर्गत गुणांमुळे गुणांचा हा फुगवटा तयार होतो ती गुणदान पद्धतीच आता बंद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्याची सुरुवात २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून होण्याची शक्यता आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीची परीक्षा मोठ्या संख्येने विद्यार्थी देतात.  अंतर्गत गुणदान पद्धतीमुळे गेल्या चार- पाच वर्षांत ९० आणि त्यापेक्षाही जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढल्याचं समोर आलं होतं.शाळांनी सढळ  हाताने अंतर्गत गुण दिल्यामुळे गुणांची ही टक्केवारी वाढलेली आहे, या निष्कर्षाप्रत शिक्षणतज्ज्ञ पोहोचले आहेत. यावर शेवटचा उपाय म्हणून चालू शैक्षणिक वर्षापासून अंतर्गत गुणदान पद्धती बंद करण्याची सुरुवात इयत्ता नववीपासून होण्याची शक्यता असल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे. सध्या ८० गुण हे लेखी परीक्षेसाठी आहेत, तर २० गुण हे अंतर्गत तोंडी परीक्षेसाठी देण्यात येतात; परंतु अनेक शाळा निकाल चांगला लागावा, या उद्देशाने गरज नसतानादेखील सर्व गुण देतात. आता हे सढळ हाताने देण्यात येणारे अंतर्गत गुणच शिक्षण विभाग बंद करणार आहे. बोर्डाकडे त्यासंबंधीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पुढील वर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलण्याची शक्यता असल्यामुळे त्यासंबंधीचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले