महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला निधी मिळतो, पण आंध्रप्रदेशच्या विकासाला नाही – टीडीपी

टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारकडून गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल तर महाराष्ट्रात छत्रपती शिवराय यांचा पुतळा उभारण्यासाठी जेवढा निधी देण्यात आला आहे, त्यापेक्षा कमी पैसा हा आंध्रप्रदेशच्या विकासासाठी दिल्याचा आरोप तेलगु देसम खासदार जयदेव गल्ला यांनी केला आहे. आज विरोधकांकडून मोदी सरकार विरोधात लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे, यावेळी गल्ला बोलत होते.

आम्ही आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मागत आहोत. काँग्रेसने तेलगू तल्लीचे दोन तुकडे केले, 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशला वाचवण्याची भाषा केली होती, म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो होतो. मात्र, त्यांनी आपले आश्वासन पाळले नसल्याची टीका खा. गल्ला यांनी केली.

दरम्यान, मोदी सरकार विरोधात टीडीपीकडून मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज लोकसभेत भाजपला आपले संख्याबळ सिद्ध करावे लागणार आहे. सत्तेमध्ये मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेकडून मतदानावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेण्यात आली आहे.