बालिकांची दिशाभूल करणाऱ्या नक्षलवाद्यांचा पर्दाफाश

जहाल नक्षलवादी डीव्हीसी पवनच्या आवळल्या पोलिसांनी मुसक्या

नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या गडचिरोली आणि आजूबाजूच्या परिसरातून बालिकांची दिशाभूल करून त्यांना नक्षल चळवळीत सहभागी करून घेतले असल्याचे नक्षलवाद्यांचे षडयंत्र उजेडात आलंय.
नुकतीच जहाल नक्षलवादी डीव्हीसी पवन याला गडचिरोली जिल्हा पोलिसांनी अटक केली  असून दोन महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्हा पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
 सोनी दसरू कोवासे व अन्य एक बालिका सदस्याच्या अटकेतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघीही  छत्तीसगड राज्यात परसेगड नक्षल दलममध्ये कार्यरत होत्या.
आत्मसमर्पण केलेल्या  दोघीही छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्हय़ातील आंबोली या गावच्या राहणाऱ्या आहेत.पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.  नक्षलवादी हे बालकांना बळजबरीने पळवून नेतात व लहान मुलांचे शोषण करून त्यांना नक्षल दलामध्ये काम करण्यास भाग पाडतात  याची माहिती या दोघींच्या चौकशीत समोर  आली आहे . नक्षली चळवळआणि त्यामध्ये होणाऱ्या त्रासाला कंटाळून या दोघीनी आत्मसमर्पण केले आहे. दरम्यान जहाल नक्षलवादी डीव्हीसी पवनला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे,त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३, ३४ व बाल संरक्षण कायदा २०१५ च्या कलम ८३ नुसार गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गेल्या काही दिवसात सांड्रा परिसरात पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात कारवाया केलेल्या असून अनेक जहाल नक्षलवाद्यांना अटक केली आहे तसेच काहींनी स्वतःआत्मसमर्पण केल्याने या परिसरातील नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.