महाराष्ट्राला अग्रस्थानी कायम ठेवण्याचा निर्धार करूया- राज्यपाल

मुंबई : देशातील प्रमुख राज्य म्हणून महाराष्ट्राला अग्रस्थानी ठेवून भविष्यात विकासाची सतत नवनवीन शिखरे गाठण्याचा आपण सर्वजण निर्धार करूया, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापौर स्नेहल आंबेकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, सेना दल, तटरक्षक दल, पोलीस दल आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राव म्हणाले की, आपल्या संविधानातील लोकशाही मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी, आपली बांधीलकी अधिक दृढ करण्यासाठी, देशाच्या व राज्याच्या सर्वांगीण विकासाकरिता काम करण्यासाठी स्वत:ला वचनबद्ध करण्याचा हा दिवस आहे. संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या अन्य सदस्यांना मी याप्रसंगी नम्रपणे आदरांजली अर्पण करतो. लोकशाही व समाजवादी व्यवस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी दीर्घ व खडतर मार्ग आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केलेला आहे. आज आपण मागे वळून पाहिले असता, जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या संघटित प्रयत्नांतून प्रगती करणे शक्य झाल्याचे आम्हाला समाधान वाटते. आपल्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होत आहेत. हे बदल विचारात घेऊन सर्वांगीण विकास साध्य करण्याच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे.

अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राने विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाची स्थापना केली आहे. सर्व नागरिकांची सुरक्षा अधिक बळकट होण्यासाठी आणि दहशतवादी हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये 7 हजार 261 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. राज्यात महानगरपालिका आणि पंचायत राज संस्था, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. संविधानातील 73 व्या व 74 व्या सुधारणांनंतर घटनात्मक संस्थांचा दर्जा प्राप्त झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांप्रती आपला विश्वास व बांधीलकी लोकशाही आचरणातून प्रतिबिंबित होते. महाराष्ट्रातील जनतेने लोकशाही मूल्ये बळकट होण्यासाठी शिस्तबद्ध व शांततापूर्ण रीतीने आपल्या मताधिकाराचा आवश्य वापर करावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले.

महाराष्ट्राने सर्वांगीण विकासाच्या वाटचालीस प्रारंभ केला आहे. राष्ट्र उभारणीच्या या प्रयत्नात शासनाबरोबर सक्रियपणे सर्वांनी सहभागी व्हावे. आपण सर्वजण मिळून सुसंधी, उद्योग, सामाजिक समानता व बंधुतेची भूमी म्हणून महाराष्ट्राचा नावलौकिक आणखी उंच करुया, असे आवाहनही त्यांनी केले.