महाराष्ट्रातील नव्या प्रगतीपर्वाचा लाभ घेण्यासाठी जगभरातील गुंतवणुकदारांनी राज्यात यावे – मुख्यमंत्री

मुंबई : राज्य सरकारचे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि उपक्रमामुळे महाराष्ट्रात नवे प्रगतीपर्व सुरू झाले असून उद्योगस्नेही वातावरणामुळे उपलब्ध होत असलेल्या राज्यातील संधीचा लाभ घेण्यासाठी जगभरातील गुंतवणुकदारांनी राज्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंगळुरु येथे केले.

प्रवासी भारतीय दिनानिमित्त आज बंगळुरु येथे आयोजित करण्यात आलेल्या संमेलनातील मुख्यमंत्र्याच्या चर्चासत्रात श्री. फडणवीस बोलत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरमय्या हे अध्यक्षस्थानी होते. तर परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे. अकबर, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी यावेळी उपस्थित होते.

इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या या संमेलनात उपस्थित प्रवासी भारतीयांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात आता अधिकाधिक संधी, सुविधा उपलब्ध होत आहेत. राज्यातील प्रत्येक खेडे ऑप्टिक फायबरने जोडण्यात येत असून नागपूर हा देशातील पहिला डिजिटल जिल्हा ठरला आहे. राज्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. नागपूर- मुंबई हा 700 किमी लांबीचा सुपर कम्युनिकेशन हायवे निर्माण करण्यात येत असून तो देशातील अशा प्रकारचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार आहे. त्याच्या माध्यमातून देशातील 22 जिल्हे जोडले जाणार असून 22 नवीन स्मार्ट शहरेही स्थापित करण्यात येणार आहेत. जे.एन.पी.टी.सारख्या आंतरराष्ट्रीय बंदराशी राज्याच्या मोठ्या भागाचे दळणवळण या मार्गामुळे सुलभ होणार आहे. तसेच विशेष औद्योगिक नगरीसह राज्यात उभारण्यात येणाऱ्या नवी मुंबई, नागपूर व पुरंदर (पुणे) या तीन नव्या विमानतळामुळे हवाई वाहतुकीसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत एक लाख सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या कामांना शुभारंभ झाल्याची माहिती देऊन श्री. फडणवीस म्हणाले की, मेट्रो मार्ग, उन्नत्त मार्ग, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, छत्रपती शिवाजी महाराजांचे आतंरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक आदी कामांचा त्यात समावेश आहे. उद्योगस्नेही वातावरणासह विविध प्रगत पायाभूत सुविधांमुळे जागतिक समुदायाने महाराष्ट्रावर नेहमीच विश्वास दर्शविला असून देशात झालेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 50 टक्क्याहून अधिक गुंतवणूक केवळ महाराष्ट्रात झाली आहे. यंदाचे वर्ष “व्हिजिट महाराष्ट्र ईयर” म्हणून साजरे करण्यात येत आहे. राज्यातील समृध्द वन्यसंपदा, मनोहारी समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले अशा वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांच्या भेटीसाठी जगभरातील भारतीयांनी आवर्जून महाराष्ट्रात यावे, असे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र आपले स्वागत आणि सहाय्य करण्यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आहे, असेही ते म्हणाले.

यासत्रानंतर संमेलनास उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांसह प्रवासी भारतीयांच्या शिष्टमंडळांशी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पॅव्हिलिअनमध्ये चर्चा केली.