पुणे-लातूर नगर परिषदेचा संपूर्ण निकाल

बारामतीच्या ३९ जागांपैकी ३५ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीच्याच पोर्णिमा तावडे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. तर दुसरीकडे इंदापूर आणि जेजूरी पालिकेचं नगराध्यक्षपद काँग्रेसने मिळवलं आहे.

पुणे आणि लातूर येथील नगरपालिकांच्या निकालातही भाजपने बाजी मारली आहे. ३२४ पैकी भाजपने तब्बल ८९ जागांवर विजय मिळवला आहे. कॉंग्रेसने ६६ जागांवर तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक ९४ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेने २५ जागांवर आणि इतर आघाड्यांकडे ५५ जागा गेल्या आहेत. भाजपने ५ जागांवर नगराध्यक्ष पदीही विजय मिळवला आहे.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे, लोणावळा, आळंदी, बारामती, सासवड, दौंड, इंदापुर, जेजुरी, शिरूर आणि जुन्नर येथील नगरपालिकांसाठी निवडणूका झाल्या. त्यातील तळेगाव, लोणावळा आणि आळंदी पालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. आळंदीत भाजपने शिवसेनेला मात देत एकूण १८ जागापैकी ११ जागा जिंकल्या आहेत. तर दौंडमध्ये २४ पैकी १५ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. मात्र दौंडच्या नगराध्यक्षपदी नागरिक हित आघाडीच्या शितल कटारिया विजयी झाल्या आहेत.

यासोबतच सासवडमध्ये जनमत आघाडीने सत्ता मिळवली आहे. १५ जागांवर जनमत आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना प्रणित लोकमित्र जनसेवा आघाडीला केवळ ४ जागा मिळवता आल्या आहेत.

लातूर:
लातूरच्या औसा पालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. एकूण २० पैकी १२ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. तर नगराध्यक्षपदीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अफसर शेख हे विजयी झाले आहेत. अहमदपूर पालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. एकूण २३ पैकी राष्ट्रवादीकडे ९, भाजपकडे ६, शिवसेना आणि काँग्रेसकडे प्रत्येकी २ तर बहुजन विकास आघाडीकडे ४ जागा आहेत. मात्र, नगराध्यक्षपद जिंकत बहुजन विकास आघाडीने सत्तेच्या चाव्या स्वतःकडे ठेवल्या आहेत. दुसरीकडे उदगीरमध्ये एमआयएमने तब्बल ६ नगरसेवक निवडून आणले आहेत. तर भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी ७ जागा जिंकल्या आहेत.