महाराष्ट्राने आणखी एक वीरपुत्र गमावला 

वीरपुत्र

पिंपळगाव :  जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २२ वर्षीय जवान यश दिंगबर देशमुख हे शहीद झाले आहेत. आज दुपारी ही घटना घडली. दरम्यान, यश देशमुख यांचे पार्थिव २८ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव येथे आणले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या शीघ्र कृती दलावर बेछूट गोळीबार केला. रहदारीचा भाग असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका पोहचू नये, यासाठी लष्कराच्या जवानांनी कारवाईदरम्यान संयम बाळगला. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबारात यश देशमुख यांच्यासह दोघे जवान गंभीररित्या जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तेरा दिवसांत काश्मिरात महाराष्ट्रातील ४ जवान शहीद नियंत्रण रेषेला लागून असलेल्या डावर, केरन, उरी, नौगाम या भागांना पाकिस्तानकडून १३ नोव्हेंबर रोजी लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यात नागपूर येथील भूषण रमेश सतई आणि कोल्हापुरातील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे या दोन जवानांना पाक सैन्याशी लढताना वीरमरण पत्करावे लागले होते. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी राजौरीत पाकच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील हे शहीद झाले होते.

महत्वाच्या बातम्या