विधानपरिषद निवडणूक निकाल; शिवसेनेच्या विजयात भुजबळांचा हात

महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून ५ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपा व शिवसेना प्रत्येकी २ जागावर विजयी झाले असून राष्ट्रवादी १ जागेवर निवडून आले आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

दराडे यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांचा पराभव केला आहे. नरेंद्र दराडे यांना पाडण्याचे विरोधकांचे सारे प्रयत्न हाणून पाडत शिवसेनेवरील विश्वास कायम असल्याचे या निवडणुकीत दाखवून दिले आहे. यावेळी दराडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती. शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांना ४१२ मते पडली असून त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार शिवाजी सहाणे (२१९ मते) यांचा १९३ मतांनी पराभव केला.

आपल्या विजयानंतर प्रतिक्रिया देतान शिवसेनेच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांची मदत झाल्यचा खळबळजनक दावा शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अनेक तर्क – वितर्क लढवले जात आहेत. खरं तर भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जातं होतं. मात्र तरीही शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंनी या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत सर्वाना धक्का दिला.