रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

Maharashtra is third in road mishaps

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी २०१६ मधील रस्ते अपघाताचा अहवाल आज सादर केला. सर्वाधिक रस्ते अपघातात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर, तामिळनाडू दुसऱ्या आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारतात सर्वाधिक अपघात होणाऱ्या शहरात दिल्ली अव्वल स्थानावर असल्याचे त्यांनी सांगितले.

देशभरात प्रत्येक तासाला ५५ अपघात होत असून दर तासाला १७ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वर्ष २०१५ च्या तुलनेत रस्ते अपघातांच्या संख्येत ४.२ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र अपघातातील मृतांचे प्रमाण ३.२ टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी ४ लाख ८० हजार ६५२ रस्ते अपघात झाले असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.