सिंचन घोटाळ्यातील आरोपींच्या जामिनावर सोमवारी सुनावणी

नागपूर: विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या कालव्यात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील 8 आरोपींच्या जामीन अर्जावर येत्या 15 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या आरोपींना अटक झालेली नाही. तसेच त्यांनी आत्मसमर्पणही केले नसल्याने त्यांचा जामीन अर्ज मंजूर करू नये असा युक्तीवाद आज, गुरुवारी शासनातर्फे करण्यात आला. उपरोक्त गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले आहेत.

त्यामध्ये कंत्राटदार आर. जे. शाह कंपनी व डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, विशाल ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, जीगर ठक्कर, अरुणकुमार गुप्ता, रमेशकुमार सोनी व गोसेखुर्द उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता उमाशंकर पर्वते यांचा समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात याप्रकरणी एकूण 12 आरोपींच्या विरोधात 4500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

यातील अन्य आरोपींमध्ये गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे मुख्य अभियंता व पूर्वअहर्ता मूल्यांकन समितीचे सदस्य सोपान रामराव सूर्यवंशी, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जीभकाटे, सेवानिवृत्त कार्यकारी संचालक देवेंद्र परशुराम शिर्के व अधीक्षक अभियंता दिलीप देवराव पोहेकर यांचा समावेश आहे. याप्रकरणी आज, गुरुवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने आरोपींच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे आता याप्रकरणी 15 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.