शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबियांची गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी घेतली भेट

मुंबई : शहरात 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणाची बाजी लावून अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडणा-या शहीद सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबियांची गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील यांनी आज भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. वरळी पोलीस कॅम्पमध्ये ओंबळे यांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून सुविधा वेळेवर पुरविल्या जातात की नाही, तसेच काही अडी-अडचणी आहेत का याबद्दल विचारणा केली. तसेच त्यांना प्रशासनाच्या सहाय्याने आवश्यक ती मदत करणार असल्याची ग्वाही देखील पाटील यांनी दिली.

रविवारी दिनांक 26 नोव्हेंबर 2017 रोजी या दहशतवादी हल्ल्याला 9 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे शहिद तुकाराम ओंबळे यांच्या मुंबईतील स्मारकासही श्री. पाटील यांनी भेट दिली. आज सद्यस्थितीत मुंबई शहरात सुरक्षेसंदर्भातील सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस, एटीएस मुख्यालय, जी.टी.रूग्णालयाजवळील परिसर, लिओपार्ड कॅफे आदी ठिकाणांना भेट दिली.

मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस दल दिवसरात्र तैनात असतात. आपात्कालीन परिस्थिती किंवा दहशतवाद हल्ला अशा घटनेनंतरही मुंबई पुन्हा नव्याने कार्यरत असते ही बाब कौतुकास्पद आणि स्फूर्ती देणारी आहे असेही पाटील यावेळी म्हणाले. शहिद ओंबळे आणि त्यांच्यासह शहिद झालेल्या सर्वच पोलीस दलातील शहीदांचा आम्हाला अभिमान आहे. शासनाला त्यांच्या बलिदानाची आजही आठवण आहे. त्यांचे बलिदान अविस्मरणीय आहे. देश कायम त्यांचे ऋणी राहील अशा भावना रणजीत पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.